भाजपाला घरचा आहेर !! भारत हे काही हिंदू राष्ट्र नाही, तुम्हाला जर भारताला हिंदू राष्ट्रच बनवायचं असेल तर संविधानच बदला : चंद्रकुमार बोस

If #CAA2019 is not related to any religion why are we stating – Hindu,Sikh,Boudha, Christians, Parsis & Jains only! Why not include #Muslims as well? Let's be transparent
— Chandra Kumar Bose (@Chandrakbose) December 23, 2019
मोदी सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस घरचा आहेर दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात मुस्लिमांचा समावेश का करण्यात आला नाही ? असा प्रश्न उपस्थित करतानाच नागरिकत्व कायद्यात केवळ काही धर्मियांचा समावेश करण्यासाठी भारत हे काही हिंदू राष्ट्र नाही. तुम्हाला जर भारताला हिंदू राष्ट्रच बनवायचं असेल तर संविधानच बदला, अशा शब्दांत चंद्रकुमार बोस यांनी भाजपला सुनावले आहे.
देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध केला जात असताना भाजपच्यावतीने पाठिंबा देण्यासाठी विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना चंद्रकुमार बोस यांनी भाजपवर जोरदार टीका केल्याने भाजपमध्येही या मुद्द्यावरून दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. सीएए कायदा कुठल्याच धर्माशी संबंधित नसल्याचं सांगितलं जात आहे, मग हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैनांवर आम्ही का जोर देत आहोत. त्यात मुस्लिमांचा समावेश का केला जात नाही? आम्ही पारदर्शी व्हायला हवे. मुस्लिमांचा त्यांच्या देशात छळ नाही झाला तर ते भारतात येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश करण्यात काहीच तोटा नाही, असं चंद्रकुमार बोस म्हणाले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या बलुचींचं काय? पाकिस्तानातील अहमदियांचं काय?, असा सवाल करतानाच भारताची तुलना इतर देशांशी करू नका. भारताचे दरवाजे सर्व देशातली जनतेसाठी खुले आहेत, असंही ते म्हणाले. बोस यांच्या या ट्विटनंतर ते भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याचं बोस यांनी खंडन करत भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
भाजपविषयी बोलताना ते म्हणाले कि , मी भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही. पक्षात काही चुकीचं होत असेल तर ते सांगणं माझी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांनी वेळ दिला नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची जेवढी संधी होती, ती भाजपच्या या निर्णयामुळे आणखी कमी झाली आहे. बंगाली लोक याचा कधीच स्वीकार करणार नाहीत. भारत काही हिंदूराष्ट्र नाही. तुम्हाला जर भारताला हिंदूराष्ट्रच बनवायचे असेल तर मग संविधानच बदला, अशी खोचक टीकाही बोस यांनी केली.