Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री

Spread the love

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना देऊन राज्यात शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यातील तसेच मुंबईतील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, अबू आझमी, माजी मंत्री नवाब मलिक, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स-एनआरसी) निर्णय झाला नाही, याची खात्री केली असून असा कायदा जर कधी आलाच तर तो केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व धर्मीयांसाठी असेल.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘एनआरसी’नुसार राज्यात एकही डिटेंशन कॅम्प होणार नाही. डिटेंशन कॅम्प बाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. भारतात अंमली पदार्थ किंवा अन्य स्वरूपांच्या गुन्हेगारीच्या कारणामुळे शिक्षा भोगलेल्या परदेशी नागरिकांसाठीची ही व्यवस्था आहे. या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठीची  कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर मायदेशात परत पाठविण्यापर्यंत जो कालावधी लागतो त्या  दरम्यानच्या  कालावधीत  तेथे ठेवण्यात येते. त्यामुळे डिटेंशन कॅम्प बाबत गैरसमज करून भिती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत देशात अशांतता, भीती आणि गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने होत असून आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पण अशा वेळी आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राची शांततेची परंपरा जपत राज्याच्या लौकिकास धक्का लागू नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.  कोणाचाही हक्क हिरावला जाणार नाही यासाठी शासन खंबीरपणे जनतेच्या पाठिशी आहे.

महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे हे राज्य आहे. नव्या पिढीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. युवकांमध्ये बेरोजगारीच्या कारणाने असंतोष निर्माण होतो. अशा वेळी त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!