Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झारखंड विधानसभा : झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत

Spread the love

रात्री उशिरा झारखंड विधानसभेच्या सर्व ८१ जागांचे निकाल प्रदीर्घ मतमोजणीनंतर हाती आले असून झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला या निकालांत मोठा धक्का बसला असून भाजपचे संख्याबळ २५ पर्यंत घसरल्याने  राज्यातील सत्ता आता भाजपच्या हातून निसटली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल सोरेन यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे पराभवाची जबाबदारी स्वीकारत रघुवर दास यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

विधानसभा निवडणुकीचा कौल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर भाजप नेते व मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने सायंकाळी ही माहिती देण्यात आली. राज्यातील जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मावळते मुख्यमंत्री रघुबर दास यांनी आभार व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेने दिलेला कौल आपल्या मान्य असून नम्रपणे तो स्विकारत असल्याचे दास यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा भाजपचा पराभव नसून याची जबाबदारी माझी असल्याचे त्यांनी म्हटले. रघुबर दास यांना स्वत: पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भाजपला नाकारत झारखंडच्या जनतेने झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. या आघाडीने ४१ हा बहुमताचा जादुई आकडा पार करत ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत. राज्यात ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने १६ जागा जिंकल्या आहेत तर राजदने १ जागा जिंकली आहे. भाजपला गेल्यावेळचे यश कायम राखता आले नाही. २०१४ मध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियनसोबत (आजसू) आघाडी केली होती. या आघाडीला ४२ जागांसह काठावरचे बहुमत मिळाले होते. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकांना सामोरा गेला. मात्र भाजपला २५ जागांपर्यंतच मजल मारता आली. मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची धुरा सांभाळणारे हेमंत सोरेन यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले. सोरेन यांनी दुमका आणि बरहेट या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. दोन्ही मतदारसंघांत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

पक्षीय बलाबल:

झारखंड मुक्ती मोर्चा- ३० । भाजप- २५ । काँग्रेस- १६ । झारखंड विकास मोर्चा- ३ । आजसू- २ । राजद- १ । भाकप- १ । राष्ट्रवादी काँग्रेस- १ । अपक्ष- २ । एकूण जागा- ८१

झारखंडच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे येथेही पुन्हा एकदा धनुष्यबाणानेच भाजपचा वेध घेतला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत निवडणूकपूर्व आघाडी करून भाजपला सत्तेतून खाली खेचले. भाजपला लागोपाठ दोन धक्के देणाऱ्या शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांची निशाणी धनुष्यबाण हीच आहे, हे विशेष.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!