भीमा कोरेगाव प्रकरणात अधिकारांचा गैरवापर करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा , शरद पवार यांची मागणी

आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भीमा कोरेगाव प्रकरणात केवळ विद्रोही कविता म्हटल्या म्हणून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करून या सर्व प्रकरणही चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
गेल्या वर्षी भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
विशेष म्हणजे ‘एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ यांच्या ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो’ ही कविता म्हटली म्हणून काही जणांवर खटले दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. अशा पोलिसांचं निलंबन करून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमावी. तीव्र मते मांडली म्हणून ज्यांना तुरुंगात टाकलं त्याबाबत चौकशी करावी,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. विचारवंत, साहित्यिक यांचाही या कायद्याला विरोध आहे. यामध्ये मॅगसेसे अवॉर्ड विजेते अरुंधती रॉय अॅडमिरल रामदास, अल्पसंख्य समाज, विचारी लोकांचा अशा अनेक घटकांचा या कायद्याला विरोध आहे,’ अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. मात्र याविरोधात आंदोलन करताना हिंसा करू नका, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.