Aurangabad Crime : एअरगन घेवून फिरणारा पोलिसांच्या जाळ्यात, मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ असलेल्या झेंडा चौकात एअरगन आणि धारदार चाकू घेवून फिरणार्यास मुकुंदवाडी पोलिसांनी गजाआड केले. पंढरीनाथ उर्फ प्रकाश लक्ष्मण आघाव (वय ४५, रा. खैरखेड, ता.सिंदखेडराजा,जि.बुलढाणा, ह.मु.राजनगर, मुकुंदवाडी) असे एअरगन व चाकू घेवून फिरणार्याचे नाव आहे.
चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ असलेल्या झेंडा चौकात एक जण रिव्हॉल्वर घेवून उभा असल्याची माहिती १८ डिसेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने दुपारी चार वाजेच्या सुमारास झेंडा चौकात सापळा रचून पंढरीनाथ उर्फ प्रकाश आघाव याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून एक एअरगन व धारदार चाकू असा ३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी जमादार विजय चौधरी यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राहुल बांगर करीत आहेत.
कल्याण मटका चालविणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात
औरंंंगाबाद : कोर्या चिठ्यावर आकडे लिहुन कल्याण मटका नावाचा जुगार चालविणार्या दिपक परशुराम ढोले (वय ५३, रा.अरब खिडकी, जयसिंगपुरा) याला गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. दिपक ढोले याच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे आकडे लिहिलेल्या १६ चिठ्या, पेन, एक मोबाईल, रोख रक्कम १६ हजार ९१० रूपये असा एकूण २६ हजार ९१० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंन्डे, जमादार सय्यद मुजीब अली, तुकाराम राठोड, गजानन मांन्टे, भावसिंग चव्हाण, आनंद वाहुळ, राहुल खरात आदींच्या पथकाने दिपक ढोले याला १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या कोपर्यावरून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान शहागंज परिसरातील हकीम हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात पाकीटमारी करणार्यास पकडले
बसस्थानकातील पोलिस चौकी बंद
औरंंंगाबाद : गेल्या काही दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकात पाकीटमारांनी उच्छाद मांडला आहे. १५ दिवसापुर्वी बसस्थानकात पाकीटमारी करणार्या दोन जणांना प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर काही दिवस काढता पाय घेतलेल्या पाकीटमारांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. गुरूवारी (दि.१९) सकाळी बसमध्ये चढणार्या प्रवाशाचा खिसा कापणार्या चोरट्यास प्रवाशांनी पकडले.
राजेंद्र उमाजी कोल्हे (वय ५५, रा.औरंगाबाद) हे गुरूवारी सकाळी कन्नडला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर मुलीसोबत आले होते. औरंगाबादहुन कन्नडकडे जाणार्या बसमध्ये राजेंद्र कोल्हे व त्यांची मुलगी चढत असतांना चोरट्याने कोल्हे यांच्या मुलीच्या पर्सची चैन उघडून आतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी चोरट्यास पकडून चोप देत पोलिस चौकीत नेले. परंतु बसस्थानकातील पोलिस चौकी बंद असल्याने चोरट्यास आगार प्रमुखाच्या दालनात कोंडून ठेवण्यात आले होते. बसस्थानकात क्रांतीचौक पोलिस दाखल झाल्यावर चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अभ्यासाच्या ताणामुळे भावी अभियंत्याची आत्महत्या
औरंंंगाबाद : अभ्यासाच्या ताणामुळे भावी अभियंत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गारखेडा परिसरातील विशालनगर भागात घडली. अक्षय सोमनाथ माने (वय २२, रा. ताडसोना, जि.बिड, ह.मु.विशालनगर, गारखेडा परिसर) असे आत्महत्या करणार्या भावी अभियंत्याचे नाव आहे.
अक्षय माने याने हा शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसापासून अभ्यासाच्या ताणामुळे तो नैराश्यग्रस्त झाला होता. अक्षय माने याने १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फ्लॅटच्या बेडरूम मधील फॅनच्या हुकाला शॉलने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अक्षयला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरण ी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.