शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला ठोकल्या बेड्या

अंबेजोगाई शहरातील एका क्रीडा शिक्षकानेच नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाम दिगंबर वरकड (वय-४३ ) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुरनं.५४५, पोक्सो कायद्याचे कलम ४,६,८,१२ आणि भादंवि३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्याच क्रीडा शिक्षक नराधमाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकाने पीडितेला क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी दिवाळीपूर्वी जालना येथे नेले होते. क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर परत आल्यानंतर त्या मुलीला अंबाजोगाई येथील शासकीय क्रीडा संकुल येथे १७ ऑक्टोबर २०१९ रोजी कारमध्ये अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या शिक्षकाने मुलीला ही घटना कोणाला सांगू नको, असे धमकावले होते. यानंतर मुलगी शाळेमध्ये प्रचंड दडपणाखाली राहत होती. ही बाब महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सविस्तर विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र शिक्षकाकडूनच अशी घटना घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.