काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची सुधारित नागरिकत्व कायद्यावरून अमित शहा यांच्यावर टीका

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याकडे ईशान्येत जाण्याची हिंमत नाही असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं सुरु आहेत. ईशान्येकडी राज्यांमध्ये कायद्याला विरोध होताना हिंसाचार झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्येकडे सुरु असलेल्या हिंसाचारावरुन मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशाच्या अनेक राज्यात आंदोलने सुरु झाली असून आसाम आणि त्रिपुरामधील अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. अमित शाह ईशान्येचा दौरा करणार होते. मात्र राज्यातील बिघडती परिस्थिती पाहता त्यांनी आपला दौरा रद्द केला. अमित शाह रविवारी पोलीस अकॅडमीला भेट देणार होते. मात्र त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दौरा रद्द केला.
सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की, “शांतता आणि सुव्यवस्था राखणं तसंच कायद्याचं पालन करत कारभार चालवणे आणि संविधानाची रक्षा करणं सरकारचं काम आहे. मात्र भाजपा सरकार देश आणि देशवासियांवरच हल्ला करत आहे”. मोदी सरकार देशवासियांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकार देशात द्वेष निर्माण करत असून तरुणांचं भविष्य अंधाराच्या दिशेने ढकलत आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.