मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोदी सरकरवर टीका , हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांनाही सुनावले…

केंद्र सरकाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेत आज शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदवतानाच विरोधकांना खडे बोल सुनावले. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात सध्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. केंद्र सरकारनं ही आंदोलनं चिरडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली. ‘देशातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. युवाशक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका,’ असा इशारा उद्धव यांनी दिला. महाराष्ट्रात सर्वत्र शांतता असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणाऱ्या व विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्यांचंच सरकार केंद्रात आहे. त्यांच्याकडं राज्यानं यापूर्वीच मदतीची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा आलेला नाही. त्यामुळं भाजपवाल्यांनी इथं आदळआपट करण्यापेक्षा केंद्रात जाऊन शिमगा करावा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुद्दा आज विरोधी बाकांवरील भाजपनं लावून धरला होता.
शिवसेनेनं यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी भाजपच्या काही सदस्यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या प्रती सभागृहात आणल्या होत्या. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर पलटवार केला. ‘शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच आहे. आम्ही तुम्हाला करायला लावलं असा आव कुणी आणू नये,’ असं ते म्हणाले. ‘राज्यानं केंद्र सरकारकडं साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २२०७ रुपयांची मागणी केली आहे. तर, पूरग्रस्तांसाठी ७ हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही. खरंतर जे विरोधक इथं बोंबलताहेत, त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उद्धव यांनी सुनावलं.