निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीबाबतच्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधीश बोबडे यांची माघार

देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या आधी या प्रकरणातल्या विनय, पवन आणि मुकेश या आरोपींनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होते . आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली त्यावेळी सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. या आधी पीडीत कुटुंबीयाच्या वतीने ज्या वकिलांनी युक्तिवाद केला होता ते आपले नातेवाईक असल्याने या प्रकरणात मी सुनावणी करणे योग्य नाही असे बोबडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस आर. भानुमती हे या खंडपीठात होते. आता बुधवारी नवे खंडपीठ तयार करण्यात येणार असून त्याच्यापुढे आता नव्याने सुनावणी होणार आहे. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आरोपींना शिक्षा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत आहे.
दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींपैकी एकाला मंडावलीहून तिहार कारागृहात हलविण्यात आले आहे. जिथे इतर गुन्हेगार तुरुंगवास भोगत आहेत. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांचा माफीचा अर्ज नाकारल्यानंतर सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सात वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आले आहे. त्याचवेळी तिहारमध्येच एक आरोपी रामसिंगने आत्महत्या केली.
फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालेल्या चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, तिहार जेल प्रशासनाने डमीमध्ये १०० किलो वाळू भरून चाचणी घेतली. याचा हेतू असा होता की, जर दोषींना फाशी देण्यात आली तर लटकवलेली विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटेल का? आरोपींना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर कारागृहात यासाठी दोरखंड तयार करण्याचं काम सुरू आहे. फाशीला लागणारे १० दोरखंड तयार करण्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे.