Aurangabad Crime : खून झालेला तो अज्ञात इसम मंडप कामगार, शर्टच्या चिठ्ठीवरुन पटली ओळख…

औरंगाबाद – शुक्रवारी मध्यरात्री ज्या अज्ञात इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता ‘त्या ‘ मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मयताच्या अंगातील शर्टाच्या काॅलरवरील टेलरच्या लेबलवरून त्याची ओळख पटविण्यात आल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मयताचे नाव प्रकाश रंगनाथ घोगरे(५५) रा.तारुखेडले ता निफाड जि. नाशिक हल्ली मु.बजाजनगर असे असून घोगरे यांनी घातलेल्या शर्टच्या काॅलरवर नाशिक येथील टेलरची चिठ्ठी सापडली. त्या टेलर शी संपर्क केल्यावर त्याने शर्ट शिलाईचे बील पाहून मयताचे नाव सांगितले. शुक्रवारी मध्यरात्री सचिन पवार या कामगारासोबंत घोगरे यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळे सचिन पवारने घोगरेंचा डोक्यात दगड घालून खून केला होता. मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयत घोगरे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मुलगा अमोल घोगरे यांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास एपीआय घेरडे करंत आहेत.