ह्रदयद्रावक : आजोबा आणि मामाकडे गेलेल्या भावंडांचा विजेच्या धक्क्याने अंत , मातेने फोडला हंबरडा…

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजात खेळण्यासाठी आलेल्या दोघा भावंडाचा पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी रात्री घडली असून या प्रकरणी पेट्रोल पंपाच्या संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुर्घटनेत मरण पावलेल्या भावंडांची नावे दीपक शंकर राखुंडे (वय १२ ) व गणेश शंकर राखुंडे (वय १० ) अशी आहेत. ही भावंडे भुसावळ येथील मामाकडे आली असतानाच ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघेही तिरुपती पेट्रोल पंपावरील कारंजात खेळण्यासाठी गेले असताना पाण्यातील विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
या घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , जामनेर रोडवरील तिरुपती पेट्रोल पंप प्रीतम कारडा यांनी चालवण्यास घेतला आहे. या पंपावर छोटेशा उद्यानात कारंजा बसवण्यात आला असून त्यात दोन फुटांइतक्या पाण्यात शनिवारी रात्री दीपक व गणेश ही भावंडे खेळत असताना त्यांना करंट बसला. सुरुवातीला एका भावाला करंट लागल्याने तो पाण्यात पडल्याने त्याला वाचण्यासाठी दुसरा गेला असता त्याचाही या घटनेत मृत्यू झाला तर दहा वर्षीय आरती नामक बालिका मात्र फेकली गेल्याने बचावली.
धुळ्यातील रहिवासी असलेल्या राखुंडे कुटुंबातील सदस्य भुसावळातील इंदिरा नगरातील मामाकडे व आजोबांकडे आले होते. सायंकाळी हि भावंडे पेट्रोल पंपावरील कारंजात खेळण्यासाठी गेल्यानंतर त्यांना शॉक लागल्याने ते बेशुद्ध झाल्याचे दिसले. पंपावरील वीजपुरवठा बंद करण्यात आल्यानंतर या बालकांना उपचारासाठी स्थानिक दवाखान्यात व तेथून गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड , बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी मृत चिमुकल्यांची माता पोहोचताच तिने हंबरडा फोडला. यावेळी अनेकांना गहिवरून आले.
दोघा चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी शिवा धर्मा हातागडे यांच्या फिर्यादीनुसार पेट्रोल पंप संचालक व मॅनेजर प्रीतम कार्डा व सोनू कार्डा यांच्याविरुद्ध भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात बालकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.