विवाहित डॉक्टर प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या…

प्रेमात असणाऱ्या विवाहित डॉक्टरने अखेर आपल्या विवाहित डॉक्टर प्रेयसीवर गोळी झाडली आणि स्वतःही आत्महत्या केली. दिल्लीच्या रोहिणी भागामध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये दोन मृतदेह सापडले. कारचे इंजिन सुरु असल्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या एका वाटसरुचे लक्ष कारवर गेले. त्याला कारमध्ये रक्ताच्या थारोळयात पडलेले दोन मृतदेह दिसले. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.
डॉ. ओमप्रकाश कुकरेजा (६२ ) आणि डॉ . सूतपा मुखर्जी (५५ ) अशी या मृत डॉक्टरांची नावे आहेत. डॉक्टरचे रोहिणी भागामध्ये स्वत:चे हॉस्पिटल असून मृत महिला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करायची. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. डॉक्टरने आधी गोळया घालून तिची हत्या केली. नंतर स्वत:चे जीवन संपवले.
पोलिसांनी सांगितले कि , मयत डॉ . कुकरेजा यांना पत्नी, मुलगा आणि मुलगी असून दोघेही डॉक्टर आहेत तर मयत महिलेला पती आणि एक मुलगा असून तो दुबई येथे आहे. सदर मयत महिला पत्नीला घटस्फोट देऊन डॉक्टरने तिच्यासोबत लग्न करावे यासाठी दबाव टाकत होती. अनेक वर्षांपासून एकत्र काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोघांनी लग्नाला जाण्यासाठी म्हणून घर सोडले होते. डॉक्टर आणि महिलेमध्ये असलेल्या प्रेमसंबंधांची दोघांच्या कुटुंबियांना माहिती होती.