Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे आजपासून दोन दिवसीय हंगामी अधिवेशन , उपमुख्यंमत्री पदावरून काँग्रेस -राष्ट्रवादीत रस्सीखेच

Advertisements
Advertisements
Spread the love

महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी नवे सरकार सज्ज झाले असून त्यासाठी आज आणि उद्या विधानसभेचे दोन दिवसीय हंगामी अधिवेशन होत आहे . या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आज शनिवारी बहुमत चाचणी  होणार आहे.

Advertisements

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नव्या सरकारला ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत आहे परंतु त्यासाठी फार वेळ न दवडता ताबडतोब विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा नव्या सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे शनिवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे सत्र होणार आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत एकत्र येत सरकार स्थापनेचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ३० नोव्हेंबरची मुदत कमी करत २७ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा दिला होता.

नव्या सरकारने हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. आता त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असली तरी विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास वळसे-पाटील यांचेच नाव अध्यक्षपदासाठी कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे. त्यामुळे  आता उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर ३ किंवा ४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार असून त्यावेळी नव्या सरकारला उपमुख्यमंत्री मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. हे पद राष्ट्रवादीकडे जाणार व त्यासाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच आहे, असे सांगितले जात आहे. असे असतानाच हे पद काँग्रेसला सोडण्यात येईल व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, असे वृत्त खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्याने आज पुढे आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झालं असलं तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून एकमत झालेलं नाही, असेच त्यावरून स्पष्ट होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!