Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिला डॉक्टरची हत्या करून जाळल्याची खबळजनक घटना , हत्येपूर्वी बलात्कार झाल्याची शक्यता

Spread the love

शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरची हत्या करून तिला जाळल्याची घटना समोर आली आहे. तिचा मृतदेह गुरुवारी एका पुलाखाली आढळून आला. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टर महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली वाहिली आणि तिला न्याय दिला जावा, अशी मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही सोशल मीडियावर होत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि , २७ वर्षीय महिला डॉक्टरचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर परिसरातील चतनपल्ली पुलाखाली सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साधारण सहा वाजता दूधविक्रेते एस. सत्यम यांना हैदराबाद-बेंगळुरू मार्गावरील उड्डाणपुलाखाली जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावातील व्यक्तींना कळवलं. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर सायबराबाद पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेतली. बुधवारी रात्री शमशाबाद पोलिसांत एक डॉक्टर महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. स्कार्फ आणि लॉकेटवरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत महिलेची दुचाकी कोथूर येथे सापडली. मात्र, पर्स आणि मोबाइल फोन सापडला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले कि , दुचाकीची नंबर प्लेट गायब आहे. आरोपींनी ही दुचाकी टोलनाक्यापासून तीस किलोमीटरवर असलेल्या कोथूरपर्यंत आणली असावी आणि तिथे नंबर प्लेट काढून टाकली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिला डॉक्टरच्या बहिणीनं दिलेल्या माहितीनुसार, ती रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. तिनं फोन करून दुचाकीत बिघाड झाल्याचं कळवलं होतं. त्यावेळी दुचाकी तिथेच सोडून टॅक्सीनं घरी येण्यास सांगितलं होतं. त्यावेळी काही लोक मदत करत असल्याचं तिनं सांगितलं आणि थोड्या वेळानं फोन करण्यास सांगितलं. मात्र, नंतर कुटुंबीयांनी फोन केल्यानंतर तिचा फोन बंद होता.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!