‘आदर्श’बाबत नव्याने चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त खोटे आणि तथ्यहीन, अशोक चव्हाण यांची कुठलीही चौकशी नाही : ईडी

बहुचर्चित वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरू केल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, असं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘आदर्श’बाबत नव्याने चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हे वृत्त काल्पनिक व तथ्यहीन असून अशा प्रकारची कोणतीही नवीन चौकशी सुरू झालेली नाही, असा खुलासा ईडीने पत्रकाद्वारे केला आहे. दरम्यान, तथ्यहीन व दिशाभूल करणारे वृत्त पसरविणारया प्रवृत्तींचा काँग्रेसनंही निषेध नोंदवला आहे.
काल दिवसभर या प्रकरणाची चर्चा चालू होती. परंतु ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, असं ईडीनं स्पष्ट केलं आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी सोसायटीत जाऊन काही मजल्यांवरील फ्लॅटची मोजणी केली. या प्रकरणाची नव्यानं चौकशी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, अशी कोणतीही चौकशी नव्याने करण्यात येत नाही. प्रसिद्ध झालेले वृत्त हे तथ्यहीन आणि पसरवलेलं आहे, असं ईडीनं स्पष्ट केलं आहे.
प्रदेश काँग्रेसनंही या प्रकरणी आलेल्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. असे तथ्यहीन व दिशाभूल करणारे वृत्त पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. काल नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर काही हितशत्रूंनी अशोक चव्हाण यांना अपशकुन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशा प्रवृत्तींचा राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते निषेध करत आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं.