Maharashtra Politics : चर्चेतली बातमी , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रातील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, कोश्यारींची बदली झाल्यास राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते असे वृत्त आहे. कलराज मिश्र यांची २२ जुलै रोजी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ९ सप्टेंबरला त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या कलराज यांनी राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद भूषवले आहे. उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. ते राज्यसभेचे सदस्यही होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप झाले. काँग्रेसने त्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी गेल्या शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते आणि फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती.
यावरून शिवसेनेसह काँग्रेसनंही त्यांच्यावर टीका केली होती. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना राज्यपालांवर पक्षपातीपणे कारभार केल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात सादर केले आहे. हे सर्व आमदार राज्यपालांपुढं उभे राहायला तयार आहेत. इतकं चित्र स्पष्ट असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर फडणवीस यांना शपथ दिली, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला होता.