Aurangabad Crime : चारचाकी वाहनाचा बनावट परवाना तयार करणारे दोघे अटकेत , गुन्हे शाखेची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई

चारचाकी वाहनाचा बनावट परवाना तयार करुन त्याआधारे वाहन चालविणा-या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात करण्यात आली. भाऊसाहेब साहेबराव लेंढे (३२, रा. हिरापुर, ता. पैठण) आणि एजाज अहेमद शेख (रा. आडूळ, ता. पैठण) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आता पर्यंत ४० बनावट लायसन्स आरोपींनी तयार करुन दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघंड झाली आहे.
चारचाकी वाहनाचा बनावट परवाना घेऊन भाऊसाहेब लेंढे हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांना खब-यामार्फत सोमवारी दुपारी मिळाली होती. त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक शिंदे हे पथकातील पोलिस नाईक नितीन मोरे, विलास वाघ, भगवान शिलोटे, परभत म्हस्के, विशाल पाटील यांच्यासह दुपारी तीनच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात दाखल झाले. यावेळी लेंढे तेथे येताच पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी वाहन परवाना जप्त केला. यावेळी त्याच्याकडे परवानाबाबत चौकशी करुन त्याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले. लेंढेजवळील परवाना बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला. तेव्हा त्याने आपण हा परवाना आडूळ येथील एजाज अहेमद शेख याच्याकडून पाचशे रुपयात बनवून घेतल्याची कबुली दिली.
……
एजाज अडकला जाळ्यात…..
लेंढेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामार्फतच आणखी एक वाहन परवाना तयार करायचा असल्याचे एजाजला सांगण्यास भाग पाडले. एजाजने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मध्यवर्ती बसस्थानक गाठले. यावेळी तेथे आलेल्या एजाजला देखील पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्याने आपणच हा परवाना तयार करुन दिल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांविरुध्द पोलिस नाईक विलास वाघ यांच्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत