Aurangabad News Update : हिंदुत्वाच्या नावे मते मागून फसवणूक , काँग्रेस -राष्ट्रवादीशी युती केल्याच्या रागातून थेट उद्धव ठाकरेंविरुद्ध पोलिसात तक्रार

मुख्यमंत्रीपद आणि ५०-५० टक्के सत्ता वाटपावरून भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालविल्याबद्दल थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात असून विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे (वय-३४ ,रा.बेगमपुरा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी रत्नाकर चौरे यांची मागणी आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाशिवआघाडी करून सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महायुतीच्या नावाखाली मत मिळवली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यामुळे आमची फसवणूक झाल्याचे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
त्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले कि , उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला होता. हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले. निकालानंतर महायुतीसोबत सरकारही स्थापन केले नाही. शिवसेनेने भाजपशी युती तोडली. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले आहे. हिंदुत्त्वाच्या नावे मते मागून उद्धव ठाकरे यांनी माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.