महाराष्ट्राचे राजकारण : काँग्रेस -राष्ट्र्वादीसोबतच्या युतीमुळे शिवसेना आमदारांची नाराजी , एकनाथ शिंदे यांचा मात्र असे काहीही नसल्याचा खुलासा

भाजपशी फारकत घेतल्यानंतर काँग्रेस -राष्ट्रवादीचा निर्णय सुद्धा लवकर होत नसल्याने आणि शरद पवार यांच्याकडून रोज वेगळेच वक्तव्य आणि कृती होत असल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही. यावरून शिवसेनेचे १७ आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या वृत्ताचं खंडन केले. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचे वृत्त खोटे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही बातमी आहे. सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलेले आहेत. ते राज्याच्या आणि पक्षाच्या हिताचाच निर्णय घेतील. त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिंदे म्हणाले.
Congress leaders arrive at NCP Chief Sharad Pawar's residence in Delhi for a meeting. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/WlW251Cw3a
— ANI (@ANI) November 20, 2019
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीची दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक गेली अर्धा तासापासून सुरु आहे. या बैठकीला काँग्रेस -राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित असून शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा करण्याची शक्यता आहे. खरे तर आजचा पवारांचा मोदींसोबतच्या बैठकीचा फार्स काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणण्यासाठीही पवारांनी केला असेल किंवा सोनिया गांधी यांना पवारांनी आधीच मोदींच्या भेटीची कल्पना दिली असेल शीही चर्चा आहे . कारण शिवसेना-काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणाबद्दल सोनिया गांधी लवकर तयार होत नाहीत. काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपताच पुन्हा रात्री खा. संजय राऊत पवारांना भेटून चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपविरुद्ध निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत दोस्ती करण्याचा प्रयत्न चालू आहे . मात्र शिवसेनेतील १७ आमदार पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे . शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आमदारांनी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला आहे का, अशीही चर्चा आहे. शिवसेनेचे १७ आमदार नाराज असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून जाहीर नाराजी व्यक्त केल्याच्या वृत्ताचं शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी खंडन केलं आहे. शिवसेनेत कोणीही नाराज नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही बातमी आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे १७ आमदार नाराज असून या आमदारांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासोबत ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खळबळ उडाली होती. शिंदे म्हणाले कि , आम्ही शिवसेना या चार अक्षरामुळे निवडून आलो आहोत. शिवसैनिकांच्या परिश्रमामुळे आम्ही आमदार झालो आहोत, याची आम्हाला जाणीव आहे. आमचा पक्ष हा शिस्तीवर आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम शब्द असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेतील. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट न येता एक व्हिडिओ व्हायरल करून या वृत्ताचं खंडन केलं आहे.