थेट दिल्लीहून : राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आज काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

आज नवी दिल्लीत बुधवारी पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राज्यातील नेते उपस्थित राहतील. स्वत: पवार किंवा काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व मात्र यात सहभागी होणार नाही. किमान समान कार्यक्रम, सत्तापदांची वाटणी यावर बैठकीत चर्चा केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या आणि सर्व राजकीय घडामोडींच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे. मात्र काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तापेचावर मौन बाळगलं आहे. संसदेत पत्रकारांनी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील सत्तापेचावर विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘नो कमेंट्स’ इतकंच उत्तर त्यांनी दिलं.
दरम्यान काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. अॅन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. काँग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत गेल्या आठवडय़ात किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली. पण, अशी काही चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी सोनियांच्या भेटीनंतर सांगितल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते. नवी दिल्लीत बुधवारी पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे.