Tata Steel : तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार टाटा स्टील , मागणीत घट आणि उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचा दावा

टाटा स्टील कंपनीच्या मागणीत घट आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळं टाटा स्टीलनं कर्मचारी कपातीचा विचार सुरू केला आहे. युरोपातील जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. दुसरीकडे भारतात टाटा स्टीलला दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाला आहे.
रॉयटर्सच्या सूत्रांनुसार, काही दिवसांपूर्वी टाटा स्टीलचे युरोपातील मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक एडम यांनी कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. मात्र, त्यावेळी कंपनीकडून निश्चित आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र, आता टाटा स्टीलनं अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा विचार कंपनीनं सुरू केला आहे.
विक्रीत वाढ करणे; तसेच युरोपातील साधारण तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणे आणि कामगिरीत सुधारणा करण्याची योजना कंपनीनं तयार केल्याचं समजतं. टाटा स्टीलच्या माहितीनुसार, मागणीत झालेली घट, व्यापारी अडचणी आणि अन्य समस्यांमुळं हा निर्णय घ्यावा लागला. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येणार आहे, त्यातील दोन-तृतीयांश कर्मचारी हे कार्यालयात काम करणारे असतील. मात्र, प्रकल्प बंद करण्यात येणार नाही, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
टाटा स्टीलच्या भारतातील व्यवसायाबाबत विचार केला तर, कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ६०.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नात घट होऊन ते ४५८०.४७ कोटी रुपये झाले आहे. तेच एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ५९०७.४७ कोटी रुपये होते. टाटा स्टीलनं गेल्या वर्षी मे मध्ये बीएनपीएलच्या माध्यमातून कर्जात बुडालेल्या भूषण स्टीलचं अधिग्रहण केलं होतं. त्यानंतर या कंपनीचं नाव बदलून टाटा स्टील बीएसएल असं करण्यात आलं होतं.