महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेनेच्या पाठिंब्यावरून काँग्रेस द्विधा मनस्थितीत, जमात उलेमा-ए-हिंद या संघटनेचेही सोनिया गांधींना पत्र

भाजपचा माजी मित्र पक्ष असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार का हा मोठा प्रश्न असतानाच जमात उलेमा-ए-हिंद या संघटनेने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय हा काँग्रेससाठी हानिकारक असेल, असा इशाराही या मुस्लीम संघटनेने दिला आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात जमात उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी म्हणतात, ‘मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक सिद्ध होईल.’
शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी यासाठी अनुकूल असली तरी काँग्रेस मात्र अजून विचारातच आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत. पण काँग्रेस हायकमांड सध्या द्विधा मनस्थितीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. पण या भेटीत राज्यातील राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आघाडीतील घटक पक्षांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. त्यामुळे सत्ताकोंडीचा पेच आणखीच वाढला आहे.
दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सोनिया गांधी अनुकूल नसल्याचं वृत्तही नुकतंच समोर आलं होतं. त्यामुळे शरद पवारांसोबतच्या बैठकीत निर्णयात्मक तोडगा निघू शकतो, असा अंदाज लावला जात होता. पण या भेटीत सत्तास्थापनेविषयी चर्चा झाली नसल्याचं सांगून शरद पवारांनी आघाडीतील नाराजीकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला.