Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : काँग्रेसचा निर्णय येत्या दोन दिवसात कळेल : रणदीपसिंग सुरजेवाला

Spread the love

https://twitter.com/rssurjewala/status/119640503225566003

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत माहिती दिली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडवण्याबाबत पुढे कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय होईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीत आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात आज सुमारे ५० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर पवारांनी आपल्या ‘६ जनपथ’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबत माहिती दिली. पवारांची ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील सत्ताकोंडीवर संभ्रम वाढवणारी ठरली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठकीत कोणतीच चर्चा झाली नाही, असे पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सोनियांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली व या स्थितीवर येत्या काळात आपण लक्ष्य ठेऊन राहावं, यावरही या बैठकीत एकमत झाल्याचं पवार यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजप सरकार का स्थापन करत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही पवार यांनी नमूद केले. पवारांच्या या विधानांनी सगळेच चक्रावून गेले आहेत. पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, याची उत्सुकता यामुळे ताणली गेली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप सत्ताकोंडी फुटलेली नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात कोणताही पक्ष यशस्वी न ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा, यावर शिवसेना ठाम राहिल्याने भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या स्थितीत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक वाढली असून हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात नवा पर्याय देतील, अशी शक्यता आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईत पार पडली. असे असतानाच आता महाराष्ट्रातील सत्तापेच दिल्लीत पोहचला असून तिथे काय घडतंय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पवारांनी शिवसेनेसोबत जाण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसले तरी पडद्यामागून बऱ्याच घडामोडी दिल्लीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!