थेट राजधानीतून : संजय राऊत यांची चौफेर टोलेबाजी , आम्ही तर एनडीएचे संस्थापक…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा भाजपाने रविवारी केली. त्यानंतर लगेचच लोकसभेमधील शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्थेतही बदल करुन त्यांनी विरोधी बाकांवर बसण्यास सांगण्यात आले. यावरुनच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन मोदी सरकार आणि सत्ताधाऱ्यांना कवीतेच्या ओळी पोस्ट खोचक टोला लगावला आहे. पाकिस्तानमधील दिवंगत कवी हबीब जालिब यांच्या कवितेच्या ओळी राऊत यांनी ट्विट केल्या आहेत.
सध्या संजय राऊत हे दिल्लीमध्ये आहेत. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन सकाळी आठच्या सुमारास एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी “तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था, उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था”, या हबीब जालिब यांच्या कवितेती ओळी पोस्ट केल्या आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राऊतांबरोबर शिवसेनेच्या सर्व खासदारांना विरोधकांच्या बाकड्यावर बसावे लागणार आहे. त्यावरुनच त्यांनी सत्ताधाऱ्यांना हा टोला लगावला आहे.
भाजपने मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने राज्यात भाजपापासून दूर जाण्याचा मार्ग निवडला. त्यानंतर राज्यातील घडामोडींचा परिणाम केंद्रामध्येही दिसून आला. अवजड उद्योग मंत्री असणाऱ्या अरविंद सावंत यांनीही मागील आठवड्यामध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी भाजपानं शिवसेना ‘एनडीए’त नसल्याची घोषणा केली. भाजपाकडून करण्यात आलेल्या घोषणेवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
“शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते,” असा प्रहार करताना राऊत यांनी , “जॉर्ज फर्नाडीस हे शेवटचे निमंत्रक होते. त्यानंतर कुणीच झाले नाही. सध्या एनडीएचे नेते कोण आहेत? कुणाच्या सहीने शिवसेनेला बाहेर काढले?,” असा प्रश्न उपस्थित केला.