शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांमध्येच नवे सरकार बनविण्याची चर्चा, भाजपशी संपर्क नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुंबईत काँग्रेस नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपला दुष्काळ दौरा सुरु केला सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडून केंद्राकडून भरिवम्डत मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या दरम्यान त्यांनी दोन दिवस नागपूर मधील दौरा केल्यानंतर नुकसान भरपाई बाबात उपाययोजना सुचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सरकारस्थापनेबाबतही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.
“राज्यातील सत्ता स्थापनेच्या दिशेने आमची चर्चा सुरु आहे. दोन दिवस किमान समान कार्यक्रमावर व्यापक चर्चा पार पडली आहे. लवकरच यातील मुद्दे दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले जातील. त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या जातील. ही चर्चा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये सुरु असून भाजपशी आम्ही संपर्क केलेला नाही”, असा महत्त्वपूर्ण खुलासा शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचेनेते शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा आपलेच सरकार येईल. हे सरकार स्थापन झालेच तरी, सहा महिने टिकणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हतं,’ अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
शरद पवार यांनी मध्यावधी होणार नाही, चिंता करू नका, असा धीर त्यांच्या पक्षाच्या आमदारांना दिला होता. नागपूरच्या पत्रकार परिषदेतही त्यांना मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतेबाबत विचारलं असता, मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार असावं आणि राज्यासमोरील यक्षप्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावं. जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितलं.