Aurangabad : विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात ग्रामपंचायत सदस्याकडून घेतली ४० हजाराची लाच

औरंंंगाबाद : ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करणेबाबत अपीलात असलेल्या प्रकरणात तक्रादाराच्या वतीने निकाल देण्यासाठी ४० हजाराची लाच घेणार्या विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकास अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१३) रंगेहाथ पकडले. सचिन लक्ष्मण पंडित (वय ३२, रा.रंजनवन हौसींग सोसायटी, सिडको, एम-२) असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथील ५० वर्षीय तक्रारदार शेतकरी ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचे पद रद्द करण्याबाबतचे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालयात अपीलात सुरु आहे. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागणार असून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने निकाल देण्यासाठी सचिन पंडित याने ११ नोव्हेंबर रोजी ५० हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, जमादार संदीप आव्हाळे, संतोष जोशी, मिलिंद ईप्पर, शेख यांच्या पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात सापळा रचून लाचखोर सचिन पंडित याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.