महाराष्ट्राचे राजकारण : गडकरी -अहमद पटेल यांची भेटही झाली चर्चेचा विषय….

Delhi: Senior Congress leader Ahmed Patel leaves after meeting Union Minister Nitin Gadkari; says, "I met him over farmer issues. It was not a political meeting or on Maharashtra politics." pic.twitter.com/zJ6IRj2sj5
— ANI (@ANI) November 6, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचात अनेक पुड्या सोडल्या जात आहेत आणि वावड्या उठत आहेत . त्यापैकी हि एक बातमी आहे . शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भाजपने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत आणखी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्थात या भेटीचे कारण जसे दाखवले जात आहे तसे ते नक्कीच नसणार कारण भाजप आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणे कदापि शक्य नाही. असे असले तरी त्यांची भेट बातमीचा विषय झाला हे मात्र नक्की .
प्रसिद्ध वृत्तानुसार गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सुमारे तासभर चालली. बाहेर येताच अहमद पटेल यांच्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र ‘आपण देशातल्या शेतीच्या प्रश्नावर गडकरी यांना भेटलो. महाराष्ट्राच्या राजकारणावर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही,’ असे ते म्हणाले. नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री असताना पटेल यांनी शेतीच्या प्रश्नावर काय चर्चा केली हा प्रश्न गुलदस्तातच आहे. त्यामुळेच ही भेट महाराष्ट्रातल्या सरकारस्थापनेसंदर्भातल्या पेचाशीच संबंधित होती, असे जाणकारांचे मत आहे. राज्यातल्या सत्ता स्थापनेपासून कॉंग्रेसने दूर रहावे, शिवसेनेला कोणताही पाठींबा देऊ नये, अशी चर्चा नितीन गडकरी व अहमद पटेल यांच्यात झाल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्याच्या दृष्टीने गडकरींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती फडणवीस यांनी गडकरींना केल्याची चर्चा होती. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. परिणामी भागवत आणि गडकरी आता या सत्तास्थापनेच्या चक्रव्यूहातून भाजपला बाहेर काढू शकतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पटेल आणि गडकरी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.