ताजी बातमी : महाराष्ट्राचे राजकारण : भाजप -सेनेचा पेच सुटल्याची बातमी , मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी सेनेला आता १६ मंत्रिपदाची ऑफर

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसाठी कायद्याने केवळ दोन दिवसाचा अवधी राहिला असल्याने सत्ता स्थापनेमागचा हालचालींना वेग आला आहे . दरम्यान आज दोन नाट्यमय घडामोडी घडल्या . यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन १०-१५मिनिटांसाठी धावती भेट घेतली तर तिकडे दिल्लीत काँग्रेसचे महत्वाचे नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली .
दरम्यान भाजप -शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरल्याचे वृत्त आहे. या सूत्रानुसार मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आणि १६ मंत्रिपदं शिवसेनेकडे असे ठरले असल्याचे समजते . सत्तेचा हा फॉर्म्युला थेट समोरासमोर ठरलेला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मध्यस्थांमार्फत एकमेकांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. त्याद्वारेच हा फॉर्म्युला ठरल्याचंही सांगितलं जात आहे. भाजपाने याआधी शिवसेनेला १३ मंत्रिपदं ऑफर केली होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदं द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेच्या ५०-५० टक्के सत्ता आणि मुख्यमंत्रीपदात अडीच अडीच वर्षे भागीदारी अशा आग्रही भूमिकेमुळे सत्तास्थापनेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार का? अशाही चर्चा रंगल्या. असं सगळं वातावरण असतानाच सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतं आहे. त्यामुळे आता १६ मंत्रिपदांच्या बदल्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडल्याचंही समजतं आहे.