महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेना के सम्मान मे , आखिर राष्ट्रवादी मैदान मे , जयंत पाटील म्हणतात , सरकार बनविण्यासाठी सेनेला पाठिंबा

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यास गेलेले असताना , अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार बनविण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपचं नव्हे तर शिवसेनेचंच सरकार येणार आहे, असं भाकीत वर्तवतानाच भाजपने शिवसेनेचे आमदार फोडल्यास पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचे उमेदवार पुन्हा निवडून आणू, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यात शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार असल्याचे संकेत मिळत असून राज्यातील राजकीय समीकरणेही बदलणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात आगामी काळात होणाऱ्या घडामोडींबाबतचे संकेत देतानाच काही सूचक विधानेही केली आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना ‘नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत’ असा मेसेज केला होता. त्यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेल्या या विधानाला अधिकच महत्त्व आल्याचं मानलं जात आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुती म्हणून निवडणूक लढले आहेत.
सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शिवसेनेचा आधार घेतल्याशिवाय मुख्यमंत्री बसविता येणार नसल्याचं चित्रं असल्याने शिवसेनेनेही मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने दोन्ही पक्षात तणातणी सुरू आहे. राज्यात अजूनही सत्तेचा तिढा सुटलेला नसताना जयंत पाटील यांनी शिवसेनेचंच सरकार येणार असल्याचं भाकीत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच शिवसेनेचे आमदार फोडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचे आमदार निवडून आणण्याचा इशाराही दिल्याने भाजपसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान भाजपकडून शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटण्याची भीती असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असल्याची चर्चा आहे . त्यामुळे शिवसेना के सम्मान मी राष्ट्रवादी मैदानमे अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे.