पवार सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज राज्यपालांना भेटणार आणि सायंकाळी दिल्लीकडे प्रयाण…

‘शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची हीच उत्तम संधी आहे’ : छगन भुजबळ
राज्यातील सत्ता स्थापनेच्या काळात भापच्या गोटात वरकरणी शांतता असून दिवाळीनंतर मुख्यमंत्री कोणतेही वक्तव्य न करता शांत आहेत तर सेनेकडून खा . संजय राऊत यांचा मुखाग्नी चांगलाच भडकला आहे . दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र नवे सरकार स्थापन करण्यासाठी कमालीचे सक्रिय झाले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर शरद आज दिवसभर व्यस्त असून काल त्यांनी राष्ट्रवादीच्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.
भाजप -सेनेच्या वादात काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेच्या बाजूने उडी घ्यावी असे पवारांचे मन बनले असून आता सोनिया गांधी यांचे मन बनविण्याच्या इराद्याने ते सायंकाळी दिल्लीकडे कूच करतील. त्यांच्या या मतावर सोनिया गांधी काय उत्तर देतील हे आज किंवा उद्या स्पष्ट होईल . दरम्यान ‘आमच्या महाआघाडीकडे बहुमत असते तर आम्ही केव्हाच सरकार स्थापन केले असते. जनमताचा कौल पाहता आम्ही विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली आहे. आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांच्या संख्याबळाचा जादुई आकडा नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘महत्त्वाचे नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. आम्ही सरकार कधी स्थापन होणार याची वाट पाहत आहोत’, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला अशा उमेदवारांची रविवारी मुंबईत बैठक आमंत्रित करण्यात आल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ‘राज्यातील जनतेने विरोधात बसण्याचा जनादेश आम्हाला दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावताना शेतकऱ्यांना उघड्यावर पडू देणार नाही’, असे पाटील म्हणाले. शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.