आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तातडीची तरतूद : देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तातडीची मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केले. सत्तास्थापनेच्या संघर्षामुळे भाजप-शिवसेनेदरम्यान निर्माण झालेल्या दुराव्यामुळे शिवसेनेचे मंत्री मात्र या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला गैरहजर राहिले.
दरम्यान विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारवर टीकास्त्र सोडले असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी विरोधकांनी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , राज्याचे मंत्री देखील राज्यभरात फिरत असून ते झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत . राज्यातील ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यानी पिक विमा उतरवलेला आहे. ही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, हे नुकसान नेमके किती, आणि कसे झाले याची माहिती घेण्याचे काम सुरू असून, लवकरच ही माहिती प्रशासनाच्या हाती येईल. त्यानंतर नुकसानभरपाईसाठी वर्गवारी केल्यानंतर मदतीची रक्कम ठरवली जाईल. यात शेतकऱ्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न असून वर्गवारी नुसार मदतीची रक्कम निश्चित केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार त्यांच्या नियमांनुसार जी मदत देईल ती देईल, मात्र, त्या मदतीची वाट न पाहता मंत्रिमंडळ उपसमितीने १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले.