महाराष्ट्राचे राजकारण : भाजपकडून राज्याभिषेकाची तयारी , वानखेडे स्टेडियम बुक ….

भाजपकडून नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम ५ नोव्हेंबरसाठी बुक करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांनी आज वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहणी केली. याआधी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान निवडण्यात आलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळ्या घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
एकीकडे भाजपने राज्याभिषेकाची तयारी पूर्ण केली असली तरी दुसरीकडे शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सेनेच्या म्हणण्यानुसार सत्तेच्या फॉर्म्युल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्यानंतर त्यादिवशी होणारी शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन करण्याबाबतची बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५०-५० फॉर्म्युल्याच्या मुद्द्यावरून तसूभरही मागे हटणार नसल्याचं जाहीर करत मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादी सत्ता स्थापन्यासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आज दिल्लीत दाखल झाले असून काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील घडामोडींकडंही सर्वांचे लक्ष लागले आहे.