मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची नाराजी , भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची स्पष्टोक्ती

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०-५० फॉर्म्युल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. ५०-५० फॉर्म्युला नाकारण्याचे ते वक्तव्य फडणवीस यांनी करायला नको होते, याच कारणामुळे सगळी चर्चा फिस्कटली, अशा शब्दांत दोन पक्षांदरम्यान उद्भवलेल्या स्थितीला फ़डणवीस यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरताना, कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आल्याचे समजू नये, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो, शत्रूपक्ष मानत नाही, आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असेही उद्धव यांनी म्हटले आहे. शिवसनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेतील संबंधाबाबतही चर्चा केली. राज्यात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे आणि तित शिवसेनेची भूमिका काय यावर उद्धव यांनी भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, उद्धव यांनी ५०-५० फॉर्म्युला किंवा उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही भाष्य केलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी जे वक्तव्य केले होते, ते करायला नको होते, असे सांगत असताना आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसना या दोन पक्षांमध्ये जे ठरले होते, ते सगळं काही मिळणारच असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.