विधिमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी भाजपाची आज महत्वपूर्ण बैठक

भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरू असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांची बुधवारी भाजप आमदारांच्या होणाऱ्या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीत फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्तावही ठेवणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेनेत सस्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू झालेला असतानाच, आज भाजपची बैठक होत असून या बैठकीत भाजप आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे. विशेष म्हणजे आजच भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही मुंबईत दाखल होत आहेत. शिवाय शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्याही बैठका होत असून हे पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करणार आहेत. युतीत नव्याने होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली रणनीतीही ठरवणार आहेत. या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होईल असे सांगितले जात आहे. तर, काँग्रेसचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण यावरही काँग्रेसच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोण विराजमान होणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले असल्याने पाटील हे मनसेचे नेते असतील. तर समाजवादी पक्षाच्या नेतेपदी अबु आसिम आझमी, बविआचे हितेंद्र ठाकूर हे नेतेपदी असतील. तर एमआयएमच्या नेतेपदी डॉ. फारुख शाह किंवा मौलाना मुफ्ती इस्माईल यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतेपदी आमदार बच्चू कडू यांची निवड अपेक्षित आहे.