Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देवेंद्र फडणवीस गुरुवारी , शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Spread the love

भाजपच्या नेतृत्वाखालीच नवे सरकार स्थापन केले जाईल आणि पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री होईल असे ठाम प्रतिपादन करून शिवसेनेत खळबळ उडवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शिवसेना आपला मुख्यमंत्री पदाबाबतचा आग्रह बाजूला ठेवून अखेरीस सत्तेत सहभागी होईल. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेलं वाकयुद्ध अजून थांबत नाही. या वादाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते अद्याप संयम राखून आहेत.  दरम्यान भाजप-शिवसेना युतीतील तणावाचं वातावरण निवळेल, या प्रतीक्षेत ते आहेत. संख्याबळाच्या आधारावर सत्तेत वाटा आणि समझोता होईल, असं त्यांना वाटतं. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे येत्या ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली होती. ‘शिवसेनेने अजून कोणताही प्रस्ताव दिलेला नसून, त्यांच्या प्रस्तावावर मेरिटनुसार विचार केला जाईल. त्यांच्या योग्य मागण्या मान्य केल्या जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!