महाराष्ट्राचं राजकारण : मुख्यमंत्री -संजय राऊत यांच्या वादात सुधीर मुनगुंटीवार यांचीही उडी , सेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी

50-50 टक्केच्या सूत्रावरून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा सध्या तरी थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील सामन्यामध्ये आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेतली आहे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याची शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजप दरम्यान आणखीनच तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप युती धर्माचं पालन करत नसेल तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला घेरले आहे. शिवसेनेला जसे सर्व पर्याय खुले आहेत, तसेच भाजपलाही पर्याय खुले आहेत. पण ‘रघुकुलरीत सदा चली आई’ या म्हणीनुसार जर आपण महायुती केली आहे. तर महायुतीच्या सोबतच राहिलं पाहिजे, असा सल्ला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिला. जसे अनेक हात शिवसेनेकडे येत आहेत. तसेच अनेक लोक भाजपला समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रश्न कुणाला किती समर्थन आहे हा नाही, तर प्रश्न हा जनतेने महायुतीच्या मागे मत रुपी आशीर्वाद उभा केला. मग जर महायुतीला जनतेचा मतरूपी आशीर्वाद मिळाला असेल तर दुसऱ्यासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, असं म्हणणं ही एक राजकीय मोठी घोडचूक होऊ शकते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नव्हती. शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद देण्यावरही चर्चा झाली नव्हती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री शब्द फिरवत असेल तर चर्चाच कशाला? असा सवाल करत शिवसेनेने आज मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी महायुती दरम्यान होणारी बैठकच रद्द केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले होते. भाजपचे केंद्रातील दोन नेते आणि शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते आज मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द फिरवला. फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युलाच ठरला नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्रीच जर शब्द फिरवत असतील तर चर्चेसाठी उरलंच काय? मग बैठक कशाला हवी? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. काही तरी ठरल्याशिवाय लोकसभा आणि विधानसभेत युती कशी झाली? काही तरी ठरलंच असेल ना? काहीही न ठरता युती होईलच कशी, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं आव्हानही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं होतं.