अमरावतीत नवनीत आणि रवी राणा आणि शिवसेनेचे दिनेश बुब आमने सामने , हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

लोकसभा -विधानसभेच्या निवडणूक संपून निकाल लागले असले तरी , अमरावतीच्या राजकारणात मात्र अप्रिय घटना घडताना दिसत आहेत. अमरावतीच्या बडनेरा येथील एका वृद्धाश्रमात आमदार रवि राणा आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांच्यात वाद उफळला आणि या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झाल्याचे वृत्त आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बघितले तर लोकप्रतिनिधींना राजकारणाचा आखाडा आणि वृद्धाश्रम यांच्यातील फरक कळत नाही, असेच दिसत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांनी आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दिनेश बुब यांनी हा आरोप फेटाळला आहे.
आमदार रवि राणा दरवर्षी दिवाळी निमित्ताने बडनेऱ्याजवळील मधुबन या वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात ते मिठाई, फळे आणि कपडे सप्रेम भेट म्हणून सगळ्यांना देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी यावर्षी देखील वृद्धाश्रमात दिवाळी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, त्याच वृद्धाश्रमात शिवसेनेकडूनही तशाच प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रवि राणा आणि शिवसेनेचे दिनेश बुब समोरासमोर आले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक घडली. या चकमकीचे रुपांतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीत झाले. यावेळी रवि राणा यांनी माईक देखील उगारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, याप्रकरणावर दिनेश बुब यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवीगाळ केल्याचा रवि राणा यांनीआरोप केला आहे. तर दिनेश बुब यांनी हा आरोप फेटाळले. मात्र, अमरावतीच्या नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीचा वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरु आहे.