Aurangabd Crime : कजार्चे आमिष दाखवून कामगाराला पावणेदोन लाखांना गंडा, वेगवेगळ्या खात्यावर जमा केली रक्कम

बोनस रकमेचे दाखवले आमिष
बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची थाप मारुन सात लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत भामट्याने कामगाराला पावणेदाने लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कर्ज देण्यापुर्वी या भामट्याने दहा लाखांच्या बोनस रकमेचे देखील आमिष दाखवले होते. त्याच्यावर विश्वास बसल्याने कामगाराने दोन वेगवेगळ्या बँक खात्यात रकमांचा भरणा केला. हा प्रकार ७ मार्च ते ६ जुलै २०१८ दरम्यान घडला.
एमआयडीसी वाळुज परिसरातील बालाजी रामदास गोडसे (३५, रा. नाथ सृष्टी, विठ्ठल वाटिका, रांजणगाव शेणपुंजी) हे कास्मो फिल्मस या कंपनीत रोजंदारीवर काम करतात. ७ मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर भामट्याने संपर्क साधत आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची थाप मारली. यावेळी भामट्याने त्यांना सात लाखांचे कर्ज घेण्यासाठी बँक खात्यात २५ हजार रुपये भरावे लागतली असे सांगितले होते. त्यावरुन गोडसे यांनी १२ मार्च रोजी भामट्याच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर पुन्हा संपर्क साधत भामट्याने त्यांना आणखी ३८ हजार रुपये भरल्यावरच कर्ज मंजुर होईल तसेच त्यावर दहा लाखांच्या बोनसची रक्कम मिळेल असे आमिष दाखवले. त्यामुळे १७ मार्च रोजी गोडसे यांनी पुन्हा भामट्याने सांगितल्यानुसार रकमेची पुर्तता केली. ६३ हजाराची रक्कम मिळाल्यावर भामट्याने गोडसेंना लुबाडण्यासाठी शक्कल लढवली. २८ मार्च रोजी पुन्हा संपर्क साधून त्याने जीएसटी व कर्ज प्रकरणाची फाईल मंजूर करण्यासाठी आणखी ३७ हजार दोनशे रुपयांची मागणी केली. तेव्हा गोडसे यांनी तीन टप्प्यात ही रक्कम भरली. यानंतर कर्ज प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून त्याने आणखी पैसे उकळले. विविध कारणे पुढे करुन भामट्याने गोडसे यांना एक लाख ७२ हजारांना गंडविले. मात्र, कजार्ची रक्कम बँक खात्यात जमा होत नसल्याचे पाहून शेवटी मंगळवारी गोडसे यांनी पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाणे गाठून भामट्याविरुध्द तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत