चर्चेतला बातमी : एक्झिट पोलवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नाही विश्वास , ईव्हीएम मध्ये गडबडीचा सातारा मतदार संघात आरोप

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणते सरकार सत्तेवर येईल याची चर्चा चालू असतानाच सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार विराजमान होईल अशा चर्चा रंगात असल्या तरी शरद पवारांच्या सभेला मिळालेला राज्यातील प्रतिसाद लक्षात घेता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल हे मानण्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते तयार नाहीत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच साताऱ्यात मात्र धक्कादायक प्रकार घडला आहे. घडाळ्याचं बटण दाबल्यानंतरही मत कमळाला जात असल्याचा प्रकार कोरेगाव मतदारसंघात समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. ‘आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी घडाळ्यासमोरील बटण दाबल्यानंतरही मत मात्र कमळाला जात आहे,’ अशी तक्रार कोरेगाव मतदारसंघातील एका गावातील मतदारांकडून करण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असा प्रकार होत असल्याचं मान्य केलं. अखेर मग त्या गावातील ईव्हीएम मशीन बदलण्यात आलं आणि मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली. याबाबत ‘एबीपी माझा’ या मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.
देशभरात गेल्या काही निवडणुकांपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही ईव्हीएमवरच घेण्यात आली. मात्र आता साताऱ्यात हा प्रकार उघडकीस आल्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
भाजप – 141
सेना – 102
काँग्रेस – 17
राष्ट्रवादी – 22
MIM – 01
मनसे – 01
इतर – 02
अपक्ष – 03