“बहिणाबाई हा आदरणीय शब्द, या शब्दात यातना होण्यासारखं किंवा चक्कर येण्यासारखं काय आहे ?” बोलले शरद पवार

बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी यांची पाठराखण केली आहे. ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं किंवा चक्कर येण्यासारखं काय आहे,’ असा टोला पवारांनी हाणला आहे.
बीडमधील परळी मतदारसंघात पंकजा आणि धनंजय या भावा-बहिणींमध्ये ‘काँटे की टक्कर’ आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडं लागलं आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली असताना प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात त्यांनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. अर्थात, धनंजय यांनी ते आरोप फेटाळून लावले आहेत. शरद पवार यांनी आज मतदानानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना या वादावर थेट भाष्य केलं. ते म्हणाले, ‘धनंजय हे पंकजांना ‘बहिणाबाई’ म्हणाले, असं खुद्द मी त्यांच्या भाषणातच ऐकलं. खरंतर या शब्दात यातना होण्यासारखं काहीच नाही. उलट हा शब्द आदरणीय आहे. ‘बहिणाबाई’ या महाराष्ट्रातील मोठ्या कवी होत्या. त्यांच्या कविता घोकतच आम्ही मोठं झालो. त्यामुळं धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई म्हणाले असतील तर त्यात मला आक्षेप घेण्यासारखं किंवा गंभीर काहीच वाटत नाही.’
परळीत भाषण करताना पंकजा चक्कर येऊन कोसळल्या होत्या. त्याबद्दल पवारांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘त्या सभेत पंकजांनी आपलं संपूर्ण भाषण केलं. तेव्हा त्यांना काही झालं नाही आणि शेवटी शेवटी अचानक चक्कर आली. परळीत वेगळे निकाल लागणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यातून आलेली ही अस्वस्थता आहे का,’ अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
पंकजा-धनंजय वादात राज्य महिला आयोगानं तत्परता दाखवत धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. पवारांनी याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं. महिला आयोगावर सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात. पण आपण भाजपचे प्रतिनिधी म्हणून बसतो हे दाखवायलाच पाहिजे असं काही नाही,’ असा चिमटा पवारांनी काढला.