मतदान संपल्यानंतर निकाल लागेपर्यंत मतदान केंद्र आणि स्ट्रॉंगरूमच्या तीन किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करा : राष्ट्रवादी

#EVM व #VVPAT उपकरणे इंटरनेटद्वारे हॅक होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ व स्ट्रॉन्ग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी @NCPspeaks ने #ElectionCommission कडे नोंदवली आहे.#VVPATVulnerability pic.twitter.com/pD4QpFvmwD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 20, 2019
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीत मतदान केंद्रांच्या परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली की २१ ते २४ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँग रुमपासून तीन किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा बंद करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी २० ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता टाळण्यासाठी २१ ते २४ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँग रुमपासून तीन किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा बंद ठेवावी. महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मतदान होत आहे, तिथेही अशाच प्रकारे इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची विनंती राष्ट्रवादीने केली आहे. मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून व्यावसायिक हॅकर्स ईव्हीएम हॅक करू शकतात आणि मतदारांनी दिलेले मत अन्य उमेदवाराच्या नावावर जाऊ शकते, अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केली आहे.