महाराष्ट्र विधानसभा २०१९ : ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार…’ सुप्रिया सुळे यांचेही ट्विट

साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली. pic.twitter.com/yMF7kPd5qK
— Supriya Sule (@supriya_sule) October 18, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या प्रचारसभेची चर्चा महाराष्ट्रभर सुरू असतानाच पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार…’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
व्हायची आणि प्रकृतीची पर्वा न करता सरकार उलथायचेच असा निर्धार करून बारामतीतून बाहेर पडलेले शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रचाराचे टोक म्हणजे त्यांनी काल साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि ते रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शिवेंद्रराजे व खासदार उदयनराजे हे पक्ष सोडून गेल्यामुळं पवारांच्या या सभेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदल्या दिवशी सभा घेऊन गेल्यानं राष्ट्रवादीसाठी ही सभा महत्त्वाची होती. असं असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळं सभा होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. मात्र, शरद पवारांनी भर पावसातच उपस्थितांसाठी भाषण सुरू केलं आणि संपूर्ण माहोल बदलून गेला. महाराष्ट्रात सध्या पवारांच्या या भाषणाची चर्चा सुरू आहे.
सुप्रिया सुळे यांनाही वडिलांची ही सभा पाहून भारावून जात पावसात भिजत भाषण करणाऱ्या पवारांच्या फोटोसह लगेचच ट्विट करताना म्हटले कि , ‘साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडवला. तुफान पावसातही माणसांनी तुडुंब भरलेलं मैदान आदरणीय साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’ हा संदेश देणारी ही सभा होती. या सभेनं सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली. पवारांच्या बातम्यांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटनेही कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.