Aurangabad : शासकीय दंत महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक-लिपीक लाचेच्या जाळ्यात

शासकिय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराचे व त्यांचे मित्राचे अनुभव प्रमाणपत्र व बंधमुक्त प्रमाणपत्र देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कार्यालयीन अधीक्षक व कनिष्ठ लिपिकाला अँटी करप्शन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.१९) रंगेहात पकडले. चंद्रकांत यादवराव बनसोडे (वय ५०) असे लाचखोर कार्यालयीन अधिक्षकाचे नाव आहे तर शिवकुमार शिवलिंग पदरे (वय २८) असे कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे.
तक्रारदार व त्याचा मित्र शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. दोघांनी अनुभव प्रमाणपत्र व बंधमुक्त प्रमाणपत्र मिळावे यासाठी महाविद्यालयाकडे अर्ज केला होता. त्यावेळी कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत बनसोडे व कनिष्ठ लिपीक शिवकुमार पदरे यांनी ८ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अॅन्टी करप्शन विभागाचे अधीक्षक अरविंद चावरिया, अपर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, जमादार विजय बाम्हदे, सुनिल पाटील, केदार फुंदे , अंकुश वाघ आदींच्या पथकाने शासकीय दंत महाविद्यालय परिसरात सापळा रचून ८ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपीक शिवलिंग पदरे याला अटक केली. चौकशी दरम्यान पदरे यांनी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत बनसोडे यांच्या सांगण्यावरून लाच घेतली असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.