Aurangabad : निवडणूक विभागाकडून २५ लाखाची रोकड जप्त, जळगाव रोडवरील वोखार्ट कंपनी चौकात कारवाई

औरंंंगाबाद : एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी खासगी वाहनातून नेली जाणारी २५ लाखांची रक्कम निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाने बुधवारी (दि.१६) रात्री जळगाव रोडवरील वोखार्ट कंपनीच्या चौकात पकडली. ही रक्कम सध्या कोषागारात ठेवण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच ही रक्कम बँकेच्या स्वाधीन केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेत स्थिर आणि फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पथकांची नियमित वाहन तपासणी सुरू आहे. संशयित वाहनधारकांना अडवून त्यांच्या वाहनाची तपासणी केली जात आहे. त्यातच बुधवारी रात्री वोखार्ट कंपनी चौकाजवळ सी. एस. बेग यांचे स्थिर पथक वाहनांची तपासणी करत असताना खासगी कार (एमएच-२०-एए-६३०१) आली. बेग यांच्यासह पोलिस कर्मचारी दिगंबर काटकर, विष्णू लिपाणे यांनी कार रोखली. पोलिस तपासणी सुरू असताना कारमधील एक पेटी उघडण्यात आली. त्यात भली मोठी रक्कम असल्याने पथक प्रमुख बेग यांनी रोकडबाबत विचारणा केली. तेव्हा ती भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमध्ये भरणा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या कर्मचा-यांनी सांगितले. त्यामुळे बेग यांनी रकमेबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र, एकाही कर्मचा-यांकडे रोकडसंदर्भात कागदपत्रे नव्हती. त्यामुळे बेग यांनी ही रोकड जप्त केली.
रक्कम व वाहनाचा पंचनामा करुन एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली. शहराच्या विविध एटीएममध्ये रकमेचा भरणा करण्याचे कंत्राट लॉजिस्टीक प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार, या कंपनीचे कर्मचा-यांनी भारतीय स्टेट बँकेतून सहा कोटी ८२ लाख रुपये काढले. त्यापैकी दोन कोटी ३७ लाख रुपये १५ एटीएम मशीनमध्ये भरले. त्यातील २५ लाखाची रोकड दोन एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कार देण्यात आल्याचे कर्मचा-यांनी बेग यांना सांगितले. मात्र, कारमध्ये रोकड नेत असताना सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नव्हती. सुरक्षारक्षक, आयकर विभागाची कागदपत्रे, शॉप अॅक्ट परवाना नव्हता. कारला बाहेरून जाळी देखील नव्हती. त्यामुळे बेग यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. तसेच कारमधील कर्मचा-यांनी पुरावे सादर करण्याबाबत सहकार्य केले नाही. त्यामुळे अखेर ही रोकड जप्त करण्यात आली. त्यांना फिरते पथक प्रमुख एस. एम. राठोड, ए. एल. इंगळे यांनी मदत केली.