कणकवली : राणे पिता -पुत्रावर उद्धव ठाकरेंची कठोर शब्दात टीका

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. ते कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात. आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली.
उद्धव ठाकरे म्हणाले कि , माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही. कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती असा हा लढा आहे अशा शब्दात त्यांनी राणेंवर टीका केली. मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्यावर याला सातबारा कळतो का ? असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत. जमिनी हडप केल्या नाहीत. त्यामुळे मला सातबारा कळत नाही.
राणेंचा एकेरी उल्लेख करताना ते म्हणाले कि , मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस ? देवेंद्र फडणवीसांनी राणेंना पाच वर्ष थांबायला सांगाव बघा ते थांबतात का? असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून भ्रम निरास झाल्यावर बघा हेच राणे काय बोलतात ते. गुंडगिरी मोडून तोडून टाकली म्हणून कोकण भगवं झालं असे उद्धव म्हणाले. रमेश गोवेकर कुठे गायब झाले? खुनशी वृत्ती अजिबात सहन करणार नाही. मी भाजपावर टीका करायला आलेलो नाही.
आज स्वाभिमान शब्द सगळयात खूश झाला असेल. सगळीकडे माना वाकवतात आणि स्वाभिमान म्हणतात. उद्धव ठाकरे मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा माणसू आहे. चोर, दरोडेखोर घुसले तर आपण मित्राला सावध करतो म्हणून आज कोकणात आलो आहे. टीका करायला आलेलो नाही. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. संदेश पारकरांना का उमेदवारी दिली नाही ? असा सवाल उद्धव यांनी विचारला असे उद्धव म्हणाले.