नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा दणका , ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचे राजीनामे

प्रत्यक्ष मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असतांना शिवसेनेच्या २ महानगर प्रमुखांसह ३५० पदाधिकारी आणि महापालिकेतील सर्वच्या सर्व ३६ नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदार संघातील युतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या कार्यकर्त्यांनी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युती संकटात आली आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचं सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
सोमवारी नाशिकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेवर बहिष्कार टाकत शिवसेने भाजपला झटका दिला. तसंच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून येत असलेल्या दबावापुढेही न झुकण्याचा निर्णय शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतला. दुसरीकडे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.