महाराष्ट्र विधान सभा २०१९ : अखेर नारायण राणे यांचा ” स्वाभिमान ” भाजपमध्ये विलीन , मुख्यमंत्र्यांनी केली सिधुदुर्गच्या विकासाची घोषणा

अखेर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आणि राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
गेल्या अनेक दिवसांपासून राणे यांच्या प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. वास्तविक नितेश राणे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असला तरी हि केवळ औपचारिकता होती. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केलं. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.
नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं. दरम्यान राज्यभरात युती असलेले शिवसेना आणि भाजपा यांची युती असली तरीही कणकवलीत मात्र कुस्ती आहे हे दिसून आलं आहे. कारण नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. नारायण राणे पक्षात आलेच होते, राज्यसभेत ते भाजपाचे खासदार आहेत हे मी सगळ्यांना सांगतच होतो. त्यांच्या स्वाभिमान संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
मुंबईत हा प्रवेश करायचा नाही तर कणकवलीत हा प्रवेश सोहळा होईल असं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आज ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं, यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल यात काहीही शंका नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.