महाराष्ट्र विधानसभा २०१९ : संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना संविधानविरोधी, भाजप-काँग्रेस दोघेही सारखेच त्यांना पराभूत करा : मायावती

बसपानेत्या मायावती यांनी आज नागपुरात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेल्या हिंदुराष्ट्र संकल्पनेस कडाडून विरोध करताना ही संकल्पना देश व संविधानविरोधी असल्याचे मत व्यक्त केले. देशात काँग्रेसने जे केले तेच भाजप करीत असून, भ्रष्टाचार व भांडवलशाही प्रवृत्तीचे हात बळकट करीत आहे. देश आर्थिक डबघाईस जात असून जातीयवादी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. काँग्रेस व भाजप यांची अंतर्गत युती देशातील मागासवर्गीयांच्या अधिकारांवर गदा आणत आहे, अशी टीका करीत या दोन्हीही पक्षांना पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
धर्मांतराबाबत बोलताना मायावती यांनी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आपण योग्य वेळी बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे या सभेत जाहीर केले. बसपाने विदर्भात ६२ उमेदवार उभे केले आहेत. बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूरचे उमेदवार सुरेश साखरे स्वतः निवडणूक लढवीत आहेत. या सर्वांच्या प्रचारार्थ कामठी मार्गावरील इंदोरा मैदानावर मायावती यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी मायावती बोलत होत्या. व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व राज्यसभेचे खासदार अॅड. वीरसिंह, डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, उपाध्यक्ष कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, जितेंद्र घोडेस्वार व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सभेत बोलताना मायावती म्हणाल्या, ‘देशाचे संविधान हिंदू धर्म डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले नाही. हा देश विविध जाती-धर्माचा आहे. सर्वधर्मीयांना एकत्र गुंफत डॉ. बाबासाहेबांनी संविधान तयार केले. त्यामुळे संघाची हिंदू राष्ट्र संकल्पना ही देशविरोधी भूमिका आहे. या देशात सर्वधर्मीयांच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे. परंतु, भाजपसारखा पक्ष जातीयवादी व मनुवादी मानसिकतेतून देशातील इतर जाती धर्मांच्या अधिकाराचे हनन करीत आहे. दबावाचे राजकारण करून देशात फूट पाडत आहे. जे काँग्रेसने केले. त्याच मार्गावर भाजप जात आहे. म्हणून या दोन्ही पक्षांना पराभूत करा. बसपने ३७० कलमाचे समर्थन केले. याचा अर्थ भाजपला पाठिंबा नाही. उत्तर प्रदेशात ‘सर्वजनहिताय व सर्वजनसुखाय’ या ब्रीदनुसार चारवेळा सत्ता मिळविली. गुन्हेगारी मोडीत काढत, विकासाचे राजकारण केले. बसपा इतर पक्षांप्रमाणे उद्योगतींकडून निधी घेत नाही. कार्यकर्त्यांच्या पैशांवर निवडणुकांना समोरे जाते. त्यामुळे बसपा कुणाच्याही दबावात येत नाही. मतदारांनी काँग्रेस, भाजप व इतर पक्षांच्या प्रलोभनाला बळी न पडता बसपाच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.’
आरक्षणावर बोलताना त्या म्हणाल्या कि , सरकारी क्षेत्रातील रिक्त पदे अद्यापही कायम आहेत. बेरोजगारी वाढत आहे. आरक्षणाचा हक्क डावलला जात आहे. खासगी क्षेत्रातील जागांवरही ब्रेक लागला आहे. संविधानाने दिलेले आरक्षणही पायदळी तुडविले जात आहे. काँग्रेसप्रमाणे भाजपही देशात मागासवर्गीय विरोधी, दलित व आदिवासीविरोधी भूमिका घेत आहे, अशी टीका मायावती यांनी केली.
बसपा आणि महाराष्ट्राविषयी बोलताना मायावती म्हणाल्या कि , बसपाची स्थापना महाराष्ट्रात झाली. दिवंगत कांशीराम यांनी हा पक्ष उत्तर प्रदेशात वाढविला. चारवेळा सत्ता आली. मात्र, महाराष्ट्रात या पक्षाला यश मिळाले नाही. मतदारांनी बसपाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. एकही आमदार व खासदार निवडून न दिल्याबद्दलची महाराष्ट्राबद्दलची नाराजी आहे, असे मायावती बोलत असताना मायावती बौद्ध धम्म कधी स्वीकारणार असा सूर मतदारांमधून आला तेंव्हा मायावती यांनी योग्यवेळी आपण बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायांसोबत धर्म परिवर्तन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.