सध्या देशात बिकट परिस्थिती , महाराष्ट्र आघाडीचे सरकार आणा : राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळ येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. सामान्यांच्या बँक खात्यात ना १५ लाख रुपये आले आणि ना सहा हजार रुपये जमा झाले. पण मोदी जातात तिथे खोटे बोलतात, असा घणाघात राहुल यांनी केला. देशातील परिस्थिती बिकट आहे. तुमच्याकडे एकच पर्याय आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू शकते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणा. आम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.
मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं दिलेल्या आश्वासनांवरून राहुल गांधी यांनी लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी आदी मुद्द्यांवर भर दिला. लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधीच्या निवडणुकीत प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तुमच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये किंवा सहा हजार रुपये जमा झाले का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. जेथे-जेथे मोदी जातात. तिथे ते खोटे बोलतात, असा आरोपही त्यांनी केला. मोदी कधी चंद्रावर बोलतात. कधी जम्मू-काश्मीर, तर कधी कलम ३७० वर बोलतात. कधी कार्बेट पार्कात जाऊन चित्रपट बनवण्याची भाषा करतात. पण तुमच्यासमोरील मुद्दे, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चकार शब्दही काढत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पण ते मिळालं का, असा सवालही राहुल यांनी केला.
‘संपूर्ण देश फक्त दहा-पंधरा उद्योगपतींच्या हातात देण्याचे काम भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जीएसटी आल्यानंतर सगळे छोटे व्यापारी बाजूला सरकले आणि आता केवळ मोठे उद्योगपतीच तग धरून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानी, अदानी यांचे लाऊडस्पीकर आहेत. त्यांच्यासाठीच ते काम करत आहेत. मोदींकडे केवळ एकच काम आहे. सर्वसामान्यांचे लक्ष अन्य ठिकाणी वळवण्याचे काम आहे. दुसरं कामच ते करत नाहीत. भाजपच्या सरकारने मनरेगा रद्द केले. आदिवासी कायदा बदलत आहेत. आज देशात नोटबंदीने फायदा झालेला एकही माणूस नाही. जीएसटीचा फायदा झालेला एकही व्यापारी नाही. आहेत का? असा सवालही त्यांनी केला. छोटे-छोटे व्यापारी देशोधडीला लागले आहेत. मुळात मोदी असेपर्यंत देशातील तरुणांना रोजगार मिळणार नाही. अर्थव्यवस्थेला अंबानी, अदानी चालवत नाहीत तर, गरीब शेतकरी, दुकानदार, मजूर, कामगार हे चालवतात, असं ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. जिथे आमचं सरकार आहे तेथे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. गरिबांच्या खिशात आम्ही पैसे टाकतो. त्यामागे विचार आहे. गरिबांच्या खिशात पैसे येतात तेव्हा ते माल खरेदी करू शकतात. कारखानेही उत्पादन घ्यायला सुरुवात करतात. त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था चालू होते. पण आता तुमच्या खिशातून पैसे काढून उद्योगपतींच्या खिशात टाकण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला.