महाराष्ट्र विधानसभा २०१९ : राज ठाकरे भाजप -सेनेवर तुफान बरसले , कामाच्या आधारावर मतदान होत नाही, भावनेवर होते व्यक्त केली खंत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील सभेद्वारे भाजपा-शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली. कामांच्या आधारावर नाहीतर, भावनेच्या आधारावर मतदान केल जात असल्याची यावेळी त्यांनी खंत बोलून दाखवली. शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्यापेक्षा, त्यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे असेही ते म्हणाले. भाजपावर निशाणा साधत ‘अब की बार मोदी सरकार’ म्हणत होते मग सरकार आलं, तरी उद्योगधंदे का बंद पडत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
यावेळी शिवसेनेला टोला लगावत ते म्हणाले की, शिवसेनेच्या होर्डिंगजवर लिहिलेले दिसते, हीच ती वेळ मग पाच वर्षे तुम्हाला नव्हता का वेळ? पाच वर्षे यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता येत नाहीत, नुसत्या धमक्या देतात. केवळ त्यांची कामं अडली तरच राजीनामे बाहेर काढायचे, जनतेच्या कामांसाठी कधी राजीनामे बाहेर काढले नाहीत. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात खड्ड्यांचा मुद्दा आहे. त्यावरून देखील त्यांनी तोफ डागली. वर्षानुवर्षे हेच मुद्दे आहेत असे ते म्हणाले. भावनेच्या आधारावर तुम्ही मतदान करत असल्याने तुम्हाला नेहमी त्याच त्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राच्या मुद्यांवरून सत्ताधारी पक्षाचे नेते बोलत नाहीत, कामाच्या आधारावर मतदान होत नाही, तुम्ही भावनेच्या आधारावरच दुसऱ्यांना मतदान करत बसणार, असे ते उपस्थितांना उद्देशुन म्हणाले.
पीएमसी बँकेच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपा-शिवसेनेवर टीका केली. लोकांच्या आय़ुष्यभराची ठेवी कशा बुडू शकतात? या बँकेच्या वरिष्ठ पातळीवर जे आहेत, ते शिवसेना-भाजपाचेच लोकं बसलेले आहेत. तुमचे पैसे बुडवल्यानंतर आता त्यांनी हात वर केले आहेत. आरबीयचा काही संबंध नाही असं सांगतात, तर मग या बँकांना मान्यता कशी काय दिली जाते? असा सवालही त्यांनी केला. तसेच, देश चालवता येत नाही म्हणून मोदी सरकारने आरबीआय़कडून एक लाख ७० हजार कोटी रुपये घेतले होते, असे त्यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयावरून टीका करताना म्हटले की, या चुकीच्या निर्णयामुळेच आज दोन ते तीन कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. अब की बार मोदी सरकावरवरून घेरत राज म्हणाले की, जर सरकार तुमच्या हातात असेल, तर मग उद्योगधंदे का बंद पडत आहेत? हजारो लोक जर बेरोजगार झाले तर त्यांनी करायचं काय? हा कोणता कारभार आहे. शेतकरी आत्महत्या रोखू असं सांगणाऱ्या या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योग जात आहेत, शेती नष्ट झाली आहे, शहरं उद्धवस्त होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
आरेतील झाडं कापण्यात आल्यावरून बोलताना राज म्हणाले की, न्यायालयावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एका रात्रीत कसा काय निर्णय होऊ शकतो. एका रात्रीतून २७०० झाडं तोडण्यात आली. हे सगळं पूर्वनियोजीत होतं. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख म्हणतात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तिथं जंगल घोषित करू, आता काय तिथं काय गवत लावणार का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. शिवाय शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेचा मुद्दा देखील नाही, हे सांगत तुम्हाला वेडं बनवल्या जात आहे असंही ते म्हणाले.